Pune : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे शेततळ्यात बुडून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
परिसरात शोककळा
पुणे ( प्रतिनिधी): पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे काल दुपारी (दि.२४)साडेतीन वाजता शेततळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ही मुले शेतमजूर कुटुंबातील आहेत.या चौघांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला असून निरगुडसर परिसरात शोककळा पसरली आहे.


याबाबतची अशी माहिती मिळत आहे की, शाळेला सुट्टी असल्यामुळे ही चारही मुले शेततळ्याजवळ खेळत होती.शेततळ्याजवळ खेळत खेळत ते सर्वजण तळ्यात उतरले. शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तसेच पोहता येत नसल्यामुळे सर्वजण पाण्यात बुडाले.

सायली काळू नवले (वय 11 ) ,श्रद्धा काळू नवले (वय 13 ), दीपक दत्ता (वय- 7 रा- कान्हेवाडी, राजगुरुनगर) आणि राधिका नितीन केदारी (वय -14 रा. कानेवाडी राजगुरुनगर)अशी मृत पावलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. श्रद्धा आणि सायलीही दोन्ही मुले गोरक्षनाथ बबन कवठे (रा. जवळे बाळेश्वर,संगमनेर) यांनी दत्तक घेतली होती.

गोरक्षनाथ बबन कवठे हे शेतमजुरीचे काम करत आहेत. शाळेला सुट्टी असल्यामुळे ही चारही मुले शेततळ्यामध्ये उतरली होती. त्यांना पोहता येत नव्हते. ही मुले बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कवठे त्यांची पत्नी ज्योती तातडीने शेततळ्याजवळ गेले. पण तोपर्यंत मुलांचे प्राण गेले होते. देवेंद्र शेठ शहा फाउंडेशन रुग्णवाहिका चालक स्वप्निल मोरे यांनी भीमाशंकर सहकारी कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मृत पावलेल्या मुलांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शेतमजूर कुटुंबांवर शोकांतिका पसरली आहे.
