बोरामणीत आयटी पार्कसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव ; माजी पंचायत समिती सदस्य धनेश सुभाष आचलारे यांची मागणी
सोलापूर :
सोलापूरकरांचे स्वप्न असलेल्या आयटी पार्कच्या उभारणीसाठी बोरामणी विमानतळ परिसर सर्वात योग्य ठरेल असा ठाम प्रस्ताव माजी पंचायत समिती सदस्य धनेश सुभाष आचलारे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सादर केला आहे.

पुणे व हैदराबाद या दोन प्रमुख आयटी शहरांच्या मधोमध असलेले बोरामणी हे स्थान आयटी उद्योगांसाठी सर्वात सोयीचे ठरणार असल्याचे आचलारे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. बोरामणी सोलापूरपासून केवळ १८ किलोमीटरवर असून हैदराबाद महामार्गालगत आहे. येथील जागा महाराष्ट्र राज्य विमान प्राधिकरणाच्या मालकीची असल्याने स्वतंत्र अधिग्रहणाची आवश्यकता नाही, असेही त्यांनी सांगितले.
सदर विमानतळासाठी ६०८ हेक्टर जागा अधिग्रहीत करण्यात आली असून त्यातील केवळ ४० ते ५० हेक्टर जागा आयटी पार्कसाठी वापरल्यास मूळ उद्देशाला बाधा पोहोचणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. शिवाय या भागात उंच इमारतींचे नियोजन विमानतळ नियमांचे पालन करून केले जाऊ शकते, असेही निवेदनात नमूद आहे.
सोलापूरातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात पुण्यातील आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. आयटी पार्क सोलापुरात उभारल्यास या तरुणांना आपल्या गावी रोजगार उपलब्ध होईल, स्थलांतराचा प्रश्न सुटेल व स्थानिक बेरोजगारी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा मुद्दा मांडण्यात आला आहे. तसेच शहरातील मिरवणुकांमुळे होणाऱ्या उद्योगधंद्यांच्या अडथळ्यांपासूनही आयटी उद्योगांना मुक्ती मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.
२००९ पासून बोरामणी विमानतळाची जागा वापरात नसल्याने ती पडून आहे. त्यामुळे या ठिकाणी आयटी पार्क उभारणीसाठी सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी धनेश आचलारे व स्थानिक नागरिकांनी केली आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!