अल्लड वयातून समाजभान आलेल्या समर्थ पिढी निर्माण करण्यासाठी सजग असलेल्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातून सन १९९३-९४ मध्ये बी. ए. ची पदवी उत्तीर्ण होऊन जवळपास तीन दशक पूर्ण होताना….. अनुभवलेली एक अविस्मरणीय सहल….
आठवणीतील सहल..

आठवणीतील सहल…… अल्लड वयातून समाजभान आलेल्या समर्थ पिढी निर्माण करण्यासाठी सजग असलेल्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातून सन १९९३-९४ मध्ये बी. ए. ची पदवी उत्तीर्ण होऊन जवळपास तीन दशक पूर्ण होताना….. अनुभवलेली एक अविस्मरणीय सहल…..

गतवर्षी स्नेहबंध मेळाव्यात सर्वानुमते सहलीचे नियोजन करण्याचे ठरले होते. त्या अनुषंगाने माझे स्नेही मित्र धनाजीराव तोडकर यांच्या संकल्पनेतून एक उत्कृष्ट सहल कशी काढावी या हेतूने सहलीचे आयोजन करण्यात आले. त्याची पूर्तता करण्यासाठी सहलीच्या पूर्व नियोजनाकरिता अनेक बैठका, व्हाट्सअप ग्रुपवर चर्चा आणि अनेकांना फोनवरून एकमेकांनी संपर्क करुन शेवटी ३० मित्र-मैत्रीणींनी सहलीला अनुमती देवून सक्रिय सहभाग नोंदविला. ज्याप्रमाणे ” मोती आणि मित्र हे दोन्ही मौल्यवान, दुर्मिळ असतात पण त्यांच्यात फरक हाच की मोती खोल समुद्रात मिळतात तर मित्र नशिबाने मिळतात.” गेल्या एक महिन्यापासून सहलीच्या नियोजनाला सुरुवात झाली. अगदी बॅग घेण्यापासून ते साहित्याच्या यादीपर्यंतचे (प्रथम उपचार साहित्य) नियोजन व्हाट्सअपच्या ग्रुपवर पोस्ट टाकून करण्यात आली. ता. २९ सप्टेंबर ला रात्री लातूरच्या मुक्ताई मंगल कार्यालयापासून अमृता ट्रॅव्हल्सने सहलीसाठी निघालेल्या गाडीची सर्वांच्या उपस्थितीत उपक्रमशील शिक्षक आमचा मित्र अंगद पवळे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला. प्रवासाला निघाल्यापासूनच गप्पागोष्टी, संगीताच्या तालावर ठेका धरून डान्स व अधून-मधून चेष्टा मस्करी करत-करत औसा-तुळजापूर-सोलापूर मार्गे निघालो. मध्येच वाटेवर असलेल्या कठारे मिल येथे थांबून आचारी लक्ष्मीकांत बाहेती व त्यांच्या टीमने बनवलेल्या रात्रीच्या रुचकर भोजनाचा आस्वाद घेतला. पुढे सोलापूर मार्गे पुण्याला पहाटे चारच्या सुमारास लक्ष्मण बदिमे, रमेश चव्हाण, कविता खणगे, रोहिणी स्वामी, मनीषा भुरे, अनु स्वामी या मित्र-मैत्रीणींना घेऊन प्रवासाला ताम्हिणी घाटातून प्रवास करताना तिथेही सकाळचे नयनरम्य निसर्गातील धुके व त्यातून होणारे सूर्यदर्शन असा मिश्र योग दुर्मिळच व तो आम्ही आमच्या कॅमेऱ्यात टिपला. त्यानंतर जवळपास १३ तासाच्या प्रवासानंतर अखेर आम्ही रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी ११ वाजता पोहोचलो. साक्षात रायगड किल्याकडे खालून पाहिल्यानंतर आम्ही थोडा वेळ स्तब्ध झालो. पुढे रोपवेचे तिकीट काढून जाताना थोडे मन घट्ट करून रोपवेत बसून किल्यावर आम्ही दोन टप्प्यामध्ये रायगडाच्या महाद्वारापाशी पोहोचलो. तिथे गाईडच्या मदतीने रायगडावरील शिवकालीन वास्तु पाहण्यास प्रारंभ झाला. रायगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची २८५१ फूट असून हा किल्ला उंच, मजबूत असल्याने शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्यास राजधानी म्हणून त्याकाळी घोषित केले होते. रायगडावरील मुख्य दरवाजा म्हणजे महाद्वार. या दरवाज्याशिवाय गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग नाही. महाद्वाराचे भव्यपण व मजबुती पाहून मन भरून आले. गंगासागर तलाव, राज्याभिषेक स्थळ इथे आम्ही ” जय भवानी ! जय शिवराय !”… हे सामुदायिक उत्स्फूर्त व गर्जनेसह धनाजी तोडकर यांच्या पहाडी आवाजात गीताला सर्व मित्रांनी साथ देवून गायले. मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात हे गीत गायल्याने परिसरातील अनेक पर्यटकांनी त्याला मोठी दाद दिली. सिंहासनाची जागा, नगरखाना (२०० मीटर लांब), महाराजांच्या समाधी स्थळी हिंदू धर्म रक्षिणारा एक नरसिंह अखेरची चिरनिद्रा घेत असल्याचे शिल्प पाहण्यात आले. शिवाजी महाराजांच्या समाधीच्या डावीकडे वाघ्या कुत्र्याची समाधी आदी बाबींविषयी सविस्तरपणे गाईडने माहिती दिली. रायगडावरून श्रीवर्धन येथे रात्री आठ वाजता हॉटेल सी रॉयल पॅलेस ला पोहोचलो. येथील रुमची विभागणी करताना आपल्या जानीजिगर, जीवलग दोस्तांसोबत राहण्याची संधी मिळाली. O तारीख १ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता बीचवर जाऊन मनमुराद आनंद लुटला. समुद्रातील लाटा व पाण्याचा लहरीनुरुप वेगवेगळ्या माध्यमातून आनंद घेतला.


येथे फोटोशेशन, पोहणे व तारुण्य विसरून बालपणात बागडलो आदी. त्यानंतर बाजूला थंड पाण्याने स्नान करून दहा वाजता हॉटेलवर जाऊन नाष्टा-चहापाणी करून पुढील प्रवासाला महाड मार्गे मुरुड-जंजिरा समुद्रकिनारी पोहचलो. तेथेही समुद्रकिनारी थांबून जल्लोषपूर्ण घोषणा देऊन आनंद लुटला. त्यानंतर आम्ही एका जहाजेतून पैलतिरावर जाताना जंजिरा किल्ला हे भारतातील व महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुडच्या किनारपट्टीवरील शहराजवळील एका बेटावर वसलेला जंजिरा हा भारतातील सर्वात मजबूत सागरी किल्ल्यांपैकी एक मानला जातो. जंजीरा किल्ला मात्र प्राचीन स्थापत्य कलेची साक्ष आहे. हा एकमेव सागरी किल्ला आहे. तो कायम अजिंक्य राहिला. या ऐतिहासिक वास्तूचे जहाजात बसून लांबूनच फोटो मोबाईलच्या कॅमेऱ्यातून टिपले व समुद्राच्या लाटांचा अनुभव घेतला. यावेळी वाऱ्याच्या झोकात जहाज देखील डुलत-डुलत जणू काय मीच या सागराचा राजा आहे असे भासवत होते. सर्वांनी या क्षणाचा आनंद लुटला. येथेच दुपारचे भोजन करून पुढे श्रीवर्धन तालुक्यातील एक टुमदार गाव दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेऊन काही क्षणचित्रे काढली. सायंकाळी श्रीवर्धन हॉटेलमधील हॉलमध्ये एक बैठक संपन्न झाली. यावेळी महेश मोटे, विवेक थोरमोटे, सतिश गायकवाड, सतिश पुंड, सुधीर कोरे, विलास कराड, देवदत्त मुंडे, कविता खणगे, मनीषा भुरे, नागेश सोनटक्के आदींनी सहल व पुढील नियोजनाबाबत आपापली मते व्यक्त केली. धनाजी तोडकर यांनी स्नेहबंध मेळाव्याची तारीख निश्चित करण्यात यावी असा प्रस्ताव मांडला. त्याला सर्वांनी एकमताने सहमती दिली. यावेळी उत्कृष्ट भोजनाचे व्यवस्थापन करणारे आमचे मित्र हनुमंत रांदड यांनी ” दुःख आडवायला… उंबऱ्या सारखा.. मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा.. ” या गीतातून मित्राबाबतची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार अंगद पवळे यांनी मानले. रात्रीच्या वेळी स्नेह भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेऊन बीचवर जाऊन समुद्राच्या लाटाचा रात्रीच्या प्रसंगी फोटो घेऊन आनंद घेतला. O तारीख २ ऑक्टोबर रोजी सकाळी स्वादिष्ट नाष्टा घेऊन सामुदायिक फोटोसेशन घेऊन उस्फूर्त घोषणाबाजी करून येथून प्रवासाला आरंभ करण्यात आला. श्रीवर्धनवरून महाबळेश्वरकडे जाताना पोलादपूर येथे पींकनिक स्पॉटला भेट दिली. तेथील मा. श्री. प्रमोद दीक्षित यांच्या पेंटिंग संग्रहालयातील सुरेख व अवर्णनीय पण वास्तववादी रेखीव पेंटिंग पाहून सर्वांची मने प्रसन्न झाली. इथेच दुपारचे भोजन, चर्चा व क्षणचित्रे काढून महाबळेश्वरकडे प्रयान करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण या प्रवासादरम्यान भेंड्या, चित्रपट नाव ओळखणे स्पर्धा, जोशपूर्ण गीते गाऊन व टेपवरील गाण्यांचा आस्वाद घेत-घेत घाटातून महाबळेश्वरच्या डोंगर माथ्यावर चढताना घनदाट जंगले, उंच डोंगर, खोल दऱ्या, हिरवागार भूप्रदेश, पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहणाऱ्या धबधब्याचा आम्ही थांबून सर्वांनी क्षणचित्रांसह आनंद घेतला. मन ताजेतवाने करणारे महाबळेश्वर हे चित्तथरारक दृश्य, आल्हाददायक हवामान, ऐतिहासिक पण निसर्गप्रेमी, साहस शोधणारे निसर्ग सौंदर्य, हिरवेगार लँडस्केप, स्ट्रॉबेरी लागवड आदी गोष्टीने निसर्गरम्य असलेल्या महाबळेश्वरला विल्यम पॉईंट, एलफिस्टन पॉईंट, सनसेट पॉईंट, कर्नाक पॉईंट, पारसी पॉईंट, मंकी पॉईंट पाहून मन प्रसन्न झाले. त्यानंतर महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा मंदिराचे दर्शन घेण्यात आले. पुढे मॅप्रो गार्डन पाहत-पाहत स्ट्रॉबेरी खरेदीचा आनंद लुटला. पुढे वाई येथील चतुर्थ भोजवर रात्रीच्या भोजनाचा आस्वाद घेतला. तिथून पुढे कात्रज मार्गे पुण्यातील काही मित्रांना सोडून लातूरकडे निघालो. सकाळी साडेआठ वाजता लातूर शहरात पोहचलो. या दरम्यान शिरीष पाटील, रमेश चव्हाण, दिपक क्षीरसागर, किरण भुसे, भगवान माळी, महादेव शिंदे, सोपान शिंदे, रमेश बरगे, राजाभाऊ हाराळकर, शिवाजी कोराटे, रोहिणी स्वामी, अनु स्वामी, कमल पालेवार, अनिता यादव, सुनिता सुर्यवंशी, फोटोग्राफर धनंजय शिंदे व वाहनचालक संजय हसनाळे आदींनी नियोजन व पुढाकार घेऊन सहल यशस्वी केली. या प्रवासात कोणी आजारी पडले नाही, या सहलीत सर्वजण तल्लीन होऊन एक वेगळाच जीवन अनुभव व सर्व काही विसरून आनंद घेतला. ” सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचं सोनं करा. समुद्र हा सर्वांसाठीच सारखाच असतो. काही जण त्यातून मोती काढतात तर काहीजण मासे काढतात तर काहीजण फक्त पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे फार महत्त्वाचे आहे. ” सहलीविषयी अनेकांनी भावना व्यक्त करताना एक नियोजन-शिस्तबध्द व सुंदर-समाधानी सफर व चांगला विरंगुळा झाल्याचे मत व्यक्त केले.


शब्दांकन : प्रा. डॉ. महेश मोटे श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरुम, ता. उमरगा, जि. धाराशिव. भ्रमनध्वनी क्र. ९९२२९४२३६२