दिव्यांग लेखक मसाजी वाघमारे यांच्या ‘यशाचे काटेरी बोचके’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते संपन्न
वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) – एक प्रेरणादायी क्षण ठरलेल्या दिव्यांग लेखक मसाजी वाघमारे यांच्या “यशाचे काटेरी बोचके” या पुस्तकाचे प्रकाशन येथील स्वामी समर्थ विश्रामधामच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे माजी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी शिवव्याख्याते शिवरत्न शेटे, राजश्री कलशेट्टी, माजी कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर, सरपंच जगदीश अंटद, अध्यक्ष व माजी सरपंच श्रीशैल दुधगी, मुख्याध्यापक विरेश थळगे, संपादक धोंडप्पा नंदे, पत्रकार दिनकर नारायणकर, आणि लेखक मसाजी वाघमारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मुख्याध्यापक शिवशरण म्हेत्रे यांनी भूषवले.
शिवरत्न शेटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “डॉ. कलशेट्टी यांनी एका तळागाळातील दिव्यांग व्यक्तीमध्ये लेखक शोधून काढला, त्याला प्रोत्साहन दिले, ही बाब खरोखरच समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा प्रकारे नवोदित लेखक समाजासमोर येतील, ही अपेक्षा आहे.”
मसाजी वाघमारे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “अनेक ठिकाणी विनंती करूनही कुणीही प्रकाशनासाठी पुढे आले नाही, ही खंत आहे. मात्र डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य केल्यामुळेच माझे पुस्तक प्रकाशित होऊ शकले. विशेषतः माझ्या आई साखराबाईचा झालेला सन्मान माझ्यासाठी मोठा आनंदाचा क्षण आहे.”
कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन माजी सरपंच महादेव होटकर यांनी केले, तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन माजी मुख्याध्यापक सिद्धारूढ काळे यांनी केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!