Akkalkot : SCERT व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत जिल्हास्तरावर करुणा गुरव आघाडीवर

अक्कलकोट (प्रतिनिधी): जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण परिषद ( SCERT), पुणे आयोजित राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत सध्या अक्कलकोट तालुक्यातील दोड्याळ मराठी शाळेत कार्यरत असलेल्या करुणा गुरव यांनी जिल्ह्यास्तरीय 9 आणि तालुकास्तरीय 25 पुरस्कार प्राप्त केले आहेत.यासाठी त्यांना जवळपास एक लाख बत्तीस हजार रुपये बक्षीस मिळणार आहे.


SCERT पुणे आयोजित राज्यस्तरीय व्हिडीओ निर्मिती स्पर्धा सन 2023-24 या वर्षात पार पडल्या. शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी राहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक /उच्च माध्यमिक/ शिक्षक प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीची खुली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा पहिली ते अध्यापक विद्यालय अशा एकूण सहा गटात प्रत्येक विषयावर संपन्न झाली.या स्पर्धेत करुणा गुरव यांनी प्रत्येक गटात प्रत्येक विषयाचे 46 दर्जेदार व्हिडीओ तयार करून सहभाग नोंदवला होता.त्यापैकी त्यांचे एकूण 34 व्हिडिओ जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर बक्षीस पात्र ठरले आहेत. यासाठी डाएट सोलापूर ,सर्व अधिकारी, शिक्षक,पालक,विद्यार्थी शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक करत आहेत.

याचबरोबर मंगरूळे हायस्कूल अक्कलकोट येथील विज्ञान शिक्षक श्री रमेश उमाटे यांचे तालुकास्तरावर आठ आणि जिल्हास्तरावर चार असे एकूण बारा व्हिडिओ बक्षीस पात्र ठरले आहेत.यांनी 55000/ चे बक्षीस मिळणार आहे.

या स्पर्धेतील जिल्ह्यातील एकूण 84 बक्षीसांपैकी अक्कलकोट तालुक्याने 17 बक्षिसे मिळवलेली आहेत. त्यापैकी करुणा गुरव-9 ,रमेश उमाटे-4 ,अश्विनी साळुंखे-2, श्रीदेवी वच्चे-1,गणेश माळी-1 यांनी ही बक्षिसे मिळवून सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट चे नाव अग्रभागी ठेवले आहे. या सर्वांचे अक्कलकोट शिक्षण विभागाने अभिनंदन व कौतुक केले आहे.