जत्रा/यात्रा

मैलारपूरच्या श्री खंडोबाची ६ जानेवारी रोजी महायात्रा

खंडोबा याञेची जय्यत तयारी सुरू......

मैलारपूरच्या श्री खंडोबाची ६ जानेवारी रोजी महायात्रा

नळदुर्ग — महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मैलारपूर (नळदुर्ग ) येथील श्री खंडोबाच्या वार्षिक यात्रा महोत्सवास ५ जानेवारी ( गुरुवारी ) रोजी प्रारंभ होत आहे. या यात्रोत्सवादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेची जय्यत पूर्वतयारी सुरू आहे. या महायात्रेस किमान सात लाख भाविक हजेरी लावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून महाराष्ट्रात श्री खंडोबाची एकूण आठ प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील मैलारपूर ( नळदुर्ग ) हे दुसरे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.
नळ राजाची पत्नी दमयंती हिच्या भक्तीमुळे श्री खंडोबा नळदुर्गात प्रकट झाले तसेच दमयंती राणीच्या भक्तीमुळे श्री खंडोबाने बाणाईस चंदनपूराहून नळदुर्गात आणून विवाह केला व नंतर जेजुरीकडे प्रस्थान केले अशी आख्यायिका आहे.

६ जानेवारी यात्रेचा मुख्य दिवस

नळदुर्गची महायात्रा पौष पौर्णिमेला भरते. महायात्रा ५ जानेवारी रोजी सुरु होणार असून, ६ जानेवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. .शुक्रवारी ( दि. ६ ) पहाटे ४ वाजता काकडा आरती झाल्यानंतर श्री खंडोबाच्या मूर्तीवर अभिषेक करुन अभ्यंगस्नान घालण्यात येणार आहे.त्यांनतर महावस्त्र अलंकार पूजा करून महानैवेद्य दाखवण्यात येणार आहे.

दिवसभर भंडारा व खोबरे उधळणे , विविध गावाहून आलेल्या नंदीध्वजाची मिरवणूक ,लहान मुलांचे जावळ काढणे, तळी भांडार उचलणे आदी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. रात्री १२ वाजता अणदूर आणि नळदुर्गच्या मानाच्या काठ्याचे व अणदूरहुन आलेल्या घोड्यांचे आगमन होणार आहे. याचवेळी रंगीबेरंगी शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात येणार आहे.

मध्यरात्री २ वाजता मंदिरात अणदूर व नळदुर्गच्या मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर पहाटे ३ वाजता श्री ची छबिना मिरवणूक निघणार आहे. शनिवारी ( दि. ७ ) दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजता जंगी कुस्ती स्पर्धा होऊन यात्रेची सांगता होणार आहे.

याञेची जय्यत तयारी सुरू

यात्रेनिमित्त श्री खंडोबा मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे यासाठी दर्शन बारी तयार करण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ,स्नान करण्याठी कॅनालला पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button