खानावळ चालक ते थ्री स्टार हॉटेल मालक
यशोगाथा गाथा आहे, सोलापूरच्या उमरड गावातील (ता. करमाळा) अरुण जनार्दन गायकवाड आणि त्यांचे मोठे बंधू बाळासाहेब (अप्पा) यांची

खानावळ चालक ते थ्री स्टार हॉटेल मालक
By अक्षता पवार
‘ जिंदगी की यही रीत है, हार के बाद ही जीत है, थोड़े आँसू हैं थोड़ी हँसी आज गम है तो कल है खुशी’ हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकले जाते, तेव्हा तेव्हा एक नवी ऊर्जा आणि एक नवी ‘उमेद’ नक्कीच जागृत होते. जीवनात संघर्ष नाही, असं आयुष्य कदाचितच कोणी जगत असेल. संघर्षमय जीवनात दुःखाचे अनेक प्रसंग आले तरी त्यास हसत हसत सामोरे जाण्याचे उदाहरण म्हणजेच करमाळ्याचे गायकवाड बंधू. लहानपणीच पितृछत्र गमावल्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी खानावळ सुरू केली. खानावळपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता थ्री स्टार हॉटेलच्या मालकापर्यंत पोचला आहे. – अक्षता पवार, पुणे
ही यशोगाथा गाथा आहे, सोलापूरच्या उमरड गावातील (ता. करमाळा) अरुण जनार्दन गायकवाड आणि त्यांचे मोठे बंधू बाळासाहेब (अप्पा) यांची. त्यांनी पुण्यात येऊन अत्यल्प पगाराची नोकरी सुरू केली. काही वर्षांमध्येच त्यांनी यशाची शिखर गाठत आपले विश्व निर्माण केले आहे. अरुण गायकवाड दोन वर्षांचे होते जेव्हा त्यांच्या वडीलांचे निधन झाले. कुटुंबाने कर्ता व्यक्तीच गमावल्याने घरातील परिस्थिती हालाखीची झाली.या काळात मुलांचे शिक्षण थांबू नये म्हणून अरुण यांच्या आईने शेळ्या राखून मुलांना मोठे केले. बाळासाहेब आणि अरुण यांनी पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण गावात केले. त्यानंतर अरुण यांनी दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी मामाचे गाव गाठले.दहावीचे शिक्षण पूर्ण होताच अरुण यांनी पुण्यात येऊन नशीबाला एक संधी देण्याचे ठरविले. पुण्यात आल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये काम करण्यास सुरवात केली. त्यावेळी सोळाशे रुपये पगार मिळत होता. नोकरी करत असतानाही शिक्षण सुरूच होते.
हेही वाचा: Success Story : जिद्द, मेहनतीच्या बळावर मजुरांची मुले पोलिस खात्यात!

त्यांनी मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम निवडला. त्यानंतर एका रेस्टॉरेंटमध्ये त्यांना नोकरी लागली आणि हळू-हळू हॉटेल क्षेत्राचा अनुभव ही येत गेला. मग त्यांनी आई आणि मोठ्या भावालाही पुण्यात आणायचे ठरविले. मात्र आई व भावाला आणल्यावर त्यांना ठेवायचे कुठे?ही पण एक मोठी समस्या होती. त्यात चुलतभाऊ देखील सोबत आले. त्यावेळी त्यांच्याकडे जेवणासाठी जादा पैसे मोजण्याची देखील ताकद नव्हती. आईला शहरात आणण्यासाठी तिची समजूत काढण्यातच दोन वर्षे गेली. अखेर शेळ्या विकल्या आणि आईला पुण्यात आणले. घर भाड्याने घेतले, पण घरात न झोपायला गादी न इतर कोणत्या वस्तू.डोक्यावर छत आहे, यातच काय ते समाधान. पण आपलं कुटुंब सोबत राहणार यात त्यांचा आनंद. मग दिवस रात्र कष्ट करण्याची ताकद वाढली. एकट्या अरुण यांच्या पगारावर संपूर्ण घर आणि घरातील सदस्यांच्या गरजा भागवणे कठीण होते.
हेही वाचा: Success Story : गरीब कुटुंबातील ‘बेसबॉल’पटूची हॉंगकॉंग भरारी; आमदार चव्हाणांमुळे स्वप्न पूर्ण

पण हे ही दिवस सरतील अशी त्यांची भूमिका. नोकरीऐवजी स्वतःचे काही तरी करायची इच्छा असल्याने त्यांनी खानावळ सुरू केली. त्यामुळे त्यांना उत्पन्न बऱ्यापैकी मिळू लागले. मग हळूहळू त्याचा अनुभव घेतला आणि या आधारे आऊटडोअर केटरिंगमध्ये जाण्याचे धाडस केले.दुसरीकडे आपला लहान भाऊ कष्ट करत आहे, पण पदवी असून देखील आपण मात्र घरीच बसून आहोत, असा विचार करत बाळासाहेब यांचे मन खावू लागले. अप्पा अशी त्यांची ओळख. अप्पा गायकवाड म्हणतात, ‘‘सुरवातीला हाती कोणतेच काम नव्हते.स्वयंपाकासाठी रॉकेल घेण्याकरिता देखील पैसे नसायचे. तेव्हा शेजारच्या एका व्यक्तीने सुचवल्यानुसार सहाव्या मजल्यापर्यंत पाणी पोहचविण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर सुमारे दीड वर्षे काहीच काम मिळाले नाही. शेवटी अरुणसोबत काम करण्याचे ठरविले. तेव्हापासून प्रत्येक चढ-उतारात आम्ही दोघे एकमेकांची साथ देत गेलो.’’सुमारे ४० लाखांचे नुकसानआऊटडोअर केटरिंग करत असतानाच एका कॉर्पोरेट कंपनीसोबत गायकवाड यांनी करार केला. त्या कंपनीच्या सुमारे ८०० कर्मचाऱ्यांच्या जेवण पुरविण्याचे काम आले. मात्र करार केल्यानंतर एकाएकी भाज्या, डाळी आदींचे दर दुपटीने वाढले. ज्या किमती ठरविल्या होत्या, त्याच्या पेक्षा जास्त तर खिशातून पैसे टाकण्याची वेळ आली. त्याकाळी अरुण यांचे तब्बल ४० लाखांचे नुकसान झाले.लॉकडाउनमध्ये पाच रेस्टॉरंट बंदआपल्या मेहनतीने व कष्टाच्या बळावर अरुण यांनी वेगवेगळे पाच रेस्टॉरंट सुरू केले. मात्र कोरोनामध्ये त्यांना ते सगळे बंद करावे लागले. उत्पन्नच नसल्यावर रेस्टॉरेंटचे भाडे, कर्मचारी, वीज बिल, त्याच्या देखभालीचा खर्च, या सर्व गोष्टींचा कशा भागवयाच्या? याची मोठी अडचण होती. मात्र रेस्टॉरंट बंद झाले तरी या कठीण प्रसंगात हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी त्यांनी उचलली. सुमारे ४० ते ६० जणांना हवी ती मदत केली. लॉकडाउन मागे घेतल्यानंतर मात्र पुन्हा जिद्दीने गायकवाड बंधूंनी कष्ट घेत थेट थ्री स्टार हॉटेल पर्यंतचा प्रवास गाठला.एकत्र कुटुंब हीच खरी यशाची किल्लीआजच्या काळात अनेक कुटुंबातील भाऊ-भाऊ वेगळे राहतात. पण बाळासाहेब आणि अरुण या भावांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. एकत्र कुटुंबाचे महत्त्व आणि त्यामुळे साध्य होणारे यश हे दोघांनी आपल्या कृतीतून दाखविले. अरुण सांगतात, “मोठ्या भावाच्या पाठिंब्यामुळे थ्री स्टार हॉटेल बरोबर स्वतःच्या आऊटडोअर केटरिंगचा व्यवसाय ही सांभाळू शकत आहे. लवकरच आता विविध शहरांमध्ये आमच्या हॉटेलच्या शाखा उघडण्यासाठी जागा पाहत आहोत.”दोन लहान मुलांना घेऊन पुण्यासारख्या शहरात जाण्याइतपत धाडस नव्हते. आयुष्यात आम्ही सुखाचे दिवस पाहू, असा स्वप्नातही विचार केला नव्हता.- लक्ष्मी जनार्दन गायकवाड, आईउद्योग क्षेत्रात येणाऱ्या तरुणांनी यशाचे शिखर गाठण्यासाठी स्वतःशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहिले पाहिजे. जो व्यक्ती प्रामाणिकपणे मेहनत करण्याची तयारी ठेवतो, त्याला कधीच हार पत्करण्याची वेळ येत नाही.- अरुण गायकवाडमाणूस उभा राहतो तो परस्परांच्या प्रेरणांतून. लढणारे हात संकटात सापडलेल्यांना प्रेरणा आणि जिद्द देतात प्रसंगी मार्गही दाखवितात.

