Maval : मावळ मतदारसंघात सरासरी ५२ टक्के मतदान
निगडी (प्रतिनिधी) दि.१३, मावळ लोकसभा मतदारसंघात सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली असून अंदाजे सरासरी ५२.३० टक्के मतदान झाले आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. वयोवृद्ध, महिला आणि दिव्यांग तसेच इतर मतदारांसह नवोदित मतदारांनी मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात सहभाग घेतला.

आपल्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटविण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावताना युवा युवतींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. निवडणूक प्रशासनाने मतदान केंद्रांवर दिलेल्या विविध सोयी-सुविधांबद्दल मतदारांनी समाधान व्यक्त केले.

यादरम्यान प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ओआरएस सह वैद्यकीय सुविधा, आशा सेविका, प्रतीक्षा कक्ष तसेच पाळणाघर, हिरकणी कक्ष, व्हिलचेअर, व्हिलचेअर मदतनीस, उन्हापासून संरक्षणासाठी शेड व मंडप, वाहनतळ इ. सुविधा देण्यात आल्या होत्या. तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहतूक व्यवस्था करण्यात आल्याने ज्येष्ठ मतदारांसह दिव्यांग मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला. शिवाय मतदारांना मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली होती. तसेच मतदान केंद्रावर निवडणूक प्रशासनाकडून पुष्प देऊन स्वागत केल्याचा क्षण मतदारांसाठी उत्साह वाढविणारा ठरला. प्रत्येक मतदान केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

याशिवाय मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्राबाहेर सेल्फी पाॅईंट सुद्धा तयार करण्यात आले होते.

