जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड जवळ कार आणि आयशरचा भीषण अपघात ; दोन जण गंभीर जखमी

निगडी (प्रतिनिधी): जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते देहूरोड दरम्यान स्वीफ्ट कार आणि आयशर टेम्पो चा भीषण अपघात झाला. यामध्ये दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला उलटून पडली आहेत. हा अपघात गुरुवारी (दि. 23) सकाळी घडला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी निगडी ते देहूरोड दरम्यान आयशर टेम्पो आणि कारचा अपघात झाला. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. याबाबत बचाव कार्य सुरू आहे. वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, टेस्टिंग आयशर आणि स्विफ्ट कार (एमएच 14/एलबी 8924) या दोन वाहनांचा निगडी ते देहूरोड दरम्यान पुणे मुंबई महामार्गावर अपघात झाला. दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला पलटी झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात आयशर टेम्पोतील एक तर कार मधील दोघेजण जखमी झाले आहेत. जखमींना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
