चव आणि दर्जामुळे लोकप्रिय ठरलेली सोलापूर येथील पेठेंची शेंगा चटणी
९० पदार्थांची निर्मिती करणारा पेठे उद्योग समूह

चव आणि दर्जामुळे लोकप्रिय ठरलेली पेठेंची शेंगा चटणी

रजनीश जोशी

९० पदार्थांची निर्मिती करणारा पेठे उद्योग समूह
लोणची, पापड, मसाले हे उन्हाळ्यात घरच्या घरी करायचे जिन्नस ! त्यातही सोलापूरसारख्या ‘निवांत’ गणल्या जाणाऱ्या शहरात तर एकेकाळी लोणचे विकत आणले म्हटले तरी लोक हसायचे. पण काळाची पावले वेळीच ओळखलेल्या उद्योजक यशवंतराव पेठे आणि त्यांच्या पत्नी निर्मलाताईंनी १९७२ साली लोणची-पापड-मसाल्याच्या उद्योगाला सोलापुरात सुरूवात केली. तो काळ अनेक अर्थाने कठीण होता. एकतर ७२ चा दुष्काळ. त्यात जो उद्योग सुरू केलेला, त्याला बाजारपेठ कशी उपलब्ध करायची आणि विक्री कशी करायची हाच मूळात प्रश्न. पण यशवंतराव आणि निर्मलाताईंनी या व्यवसायाचे भविष्य पाहिले होते. त्यांचा होरा अचूक निघाला. आज सोलापुरात पेठे हे नाव केवळ पापड, लोणच्यांसाठी मर्यादित राहिले नाही. वेगवेगळ्या प्रकारचे ९० पदार्थ पेठे उद्योग समूह तयार करतो आणि यशवंतराव – निर्मलाताई, दिलीपराव – सुवर्णाताई या पहिल्या व दुसऱ्या पिढीनंतर चैतन्य पेठे हे तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी या व्यवसायाचा विस्तार करत आहेत.

सध्या सुवर्णाताई पेठे यांनी पेठे उद्योग समुहाची सूत्रे सांभाळली आहेत. चैतन्य पेठे समुहाच्या विस्तारासाठी अथक परिश्रम घेत आहेत. पण या व्यवसायाची सुरूवात सोपी नव्हती. सुवर्णाताई म्हणाल्या, ” माझे सासरे यशवंतराव द्रष्टे होते, त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. ज्यावेळी या व्यवसायाला त्यांनी सुरूवात केली, त्यावेळी मसाले, चटण्या, लोणची कुणीही विकत आणत नसत. चाळसंस्कृती किंवा वाडासंस्कृती जिवंत होती. महिला वर्ग एकमेकींकडे जाऊन उन्हाळ्यात वर्षभरासाठीचे पदार्थ तयार करून ठेवत. त्यामुळे ते विकत आणण्याची गरज भासत नसे. पण पेठेंच्या घरी तयार केलेल्या पदार्थांना असलेली वैशिष्ट्यपूर्ण चव लोकांच्या लक्षात येऊ लागली. किंमतही किफायतशीर असल्याने मध्यमवर्गीय महिला ग्राहकांनादेखील आमचे पदार्थ आवडू लागले, त्यांना विकत घेणे सोयीचे ठरू लागले.”

उत्तम चव हाच मुख्य आधार आणि गुणवत्ता असलेल्या पेठेंच्या चटणी-लोणच्यांची आरंभीची निर्मितीप्रक्रिया घरगुती होती. घरीच हाताने हे पदार्थ केले जात. मशिनचा वापर नव्हताच, किंबहुना तशा मशिन्स अद्याप बाजारात यावयाच्या होत्या. दळणे, कुटणे, भाजणे ही सगळी प्रक्रिया घरीच केली जाई. त्यामुळे ग्राहकांना ही घरगुती चव अतिशय आवडली. लोक एकमेकांना स्वतः होऊन शिफारस करायला लागले. बाजारात वेगवेगळ्या ब्रँडची इतर जिल्ह्यातील लोणची-पापड विक्रीसाठी उपलब्ध व्हायला लागली, पण कमी किंमत आणि दर्जेदार चव यामुळे पेठेंच्या मालाला उठाव मिळत गेला. घरी सुरू केलेल्या या व्यवसायाला जागा कमी पडायला लागली. मग, होटगी रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीत कारखान्यासाठी जागा घेण्यात आली.
सुवर्णाताई सांगतात, ”त्यावेळी होटगी रस्त्यावरील या वसाहतीत येणेदेखील कठीण होते. कारण सातरस्त्याजवळ सोलापूरची हद्द जवळपास संपुष्टात आल्यासारखी होती. वाहनांची सोय नव्हती. सिटी बससेवा सात रस्ता स्टॉपपर्यंतच होती. पण अशा खडतर परिस्थितीतही न डगमगता नव्या कारखान्याचा जम बसवला. बाजारातील मागणी प्रचंड वाढली होती. त्यामुळे मशीनची गरज भासायला लागली. गरजेनुसार त्यांची खरेदी आणि वापर सुरू झाला. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली. विक्री वाढली. मात्र, चव आणि दर्जामध्ये कुठेही फरक पडता कामा नये, याची दक्षता घेतली.”

पेठेंचा घरगुती लोणचे-चटणीचा व्यवसाय वाढतो आहे हे लक्षात येताच, अनेक प्रतिस्पर्धी निर्माण झाले. अन्य जिल्ह्यांमधूनही विक्रीसाठी येणारे उद्योजक होते. तथापि, आजही पेठेंची चव अत्यंत वेगळी आहे. बाजारातील अन्य कोणत्याही पदार्थांपेक्षा पेठेंचे पदार्थ रूचकर आहेत, असे ग्राहक सांगतात. महत्त्वाचं म्हणजे, पेठेंचे ग्राहकही दोन पिढ्यांचे आहेत. सोलापूरातील अनेक जुने ग्राहक आजही आपल्या भोजनाच्या ताटात पेठेंची चटणी, लोणची, पापडच पसंत करतात ही वस्तुस्थिती आहे. पेठे उद्योग समुहात आजमितीस चटणी-लोणची ही आद्य उत्पादने तर आहेतच, पण चटण्यांचे दहा-बारा प्रकार, पापडांचे विविध प्रकार, कुरुड्या, मसाल्यांचे विविध पदार्थ, उपवासाला चालणारे पदार्थ, टोमॅटो सॉस, मिरची ठेचा असे जवळपास ९० प्रकार मिळतात. प्रत्येकाला स्वतःची चव आणि स्वतंत्र ग्राहक आहे. कालांतराने सोलापूर शहराचा विस्तार वाढत गेला. एकेकाळी होटगी रस्त्यावर येण्यासाठी वाहन मिळणे अवघड होते, तो होटगी रस्ता आता गावाच्या मध्यात आला आहे. त्याचा फायदा पेठेंच्या विस्ताराला झाला. सोलापूर शहराच्या विविध भागात पेठे उद्योग समुहाच्या पदार्थांच्या आज आठ शाखा आहेत. खासदार सुप्रिया सुळे, गायिका उषा मंगेशकर, अभिनेते प्रशांत दामले, अरुण नलावडे, संदीप पाठक अशा अनेक कलावंतांनी चव चाखून समाधान व्यक्त केले आहे.
दिलीपराव, सुवर्णाताई आणि चैतन्य यांनी पेठे उद्योगातील सामान्य कामगारालाही आपल्या कुटुंबातील सदस्य मानले आहे. कारखान्यामध्ये प्रामुख्याने महिला कामगारांना संधी दिली आहे. सुमारे चाळीस वर्षांपासून त्या कारखान्यात सेवारत आहेत. त्यांचा प्रामाणिकपणा, कामावरील निष्ठा आणि समुहाबद्दलचा जिव्हाळा यामुळे हा समुह म्हणजे एक भलेथोरले कुटुंबच झाले आहे. चैतन्य पेठे म्हणाले, ‘खाद्य पदार्थांचा व्यवसाय असल्यामुळे सुरूवातीपासूनच जास्तीत जास्त महिलांना आम्ही सामावून घेतले. आमच्या कारखान्यामध्ये सध्या ९० टक्के कामगार महिलाच आहेत. विशेष म्हणजे माझी पिढी आली तरी जुन्या महिला स्नेहभावाने कार्यरत आहेत. कामगार म्हणून त्यांना वागवत नाही. कित्येक महिलांनी आमच्याकडे काम करून स्वतःचे घर बांधले, आपल्या मुलांची शिक्षणे पूर्ण केली. स्वतःचे कुटुंब वाढवले, सावरले. विशेष म्हणजे, ‘इएसआय’ किंवा अगदी पी.एफ.सारख्या सुविधाही आम्ही त्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत.”
inline-image
प्रतिवर्षी कोट्यवधीची उलाढाल करणाऱ्या पेठे उद्योग समुहाचा विस्तार वाढत आहे. पण सध्या तरी तयार केलेल्या ९० प्रकारच्या उत्पादनांना सोलापूरबाहेर नेण्याची पाळी येत नाही, कारण उत्पादित माल सोलापुरातच संपतो. रोजच्या रोज ताजा माल बनवून तो ग्राहकांना उपलब्ध करून दिला जातो, हे आणखी एक वेगळेपण लक्षात घेण्यासारखे आहे. सुवर्णाताई सांगतात, ‘आता संपूर्ण कारखाना अत्याधुनिक करायचा आहे. ‘पेठे’ हा ब्रँड संपूर्ण देशात लोकप्रिय करण्याचे आमचे लक्ष्य आहे. ‘ ज्या पद्धतीने आणि विश्वासाने हे काम सुरू आहे, ते पाहिले तर सुवर्णाताईंचे ‘लक्ष्य’ लवकरच पूर्ण होईल, यात शंका नाही.
सुवर्णाताई पेठे – ९८८१००४००७
चैतन्य पेठे – ९९२१४७४६६६
हॉटेल व्यवसायाकरता लागणारे लायसन्स आणि रजिस्ट्रेशन याकरता deAsra फाउंडेशन सहाय्य करते. त्याचा लाभ तुम्हीही घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी या WhatsApp 93730 35540 क्रमांकावर तुम्ही deAsra सोबत संपर्क करू शकता.
संकलन –रजनीश जोशी,सोलापूर