अक्कलकोट व दुधनी बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्याची मागणी शेतकरी व्यापार्यांतून होत आहे.
बाजार समितीची निवडणूक


अक्कलकोट व दुधनी बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होण्याची मागणी शेतकरी व्यापार्यांतून होत आहे.

अक्कलकोट, : अक्कलकोट व दुधनी बाजार समितीची ही निवडणूक भाजपा विरुध्द काँग्रेस अशीच लढत होणार असल्याचे सध्यातरी चित्र असले तरी सदर संस्थेच्या निवडणूका बिनविरोध होण्याची मागणी शेतकरी व्यापार्यांतून होत आहे.
अक्कलकोट बाजार समितीची स्थापना सन 1952 साली झाली असून पूर्वी शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या जुना अडत बाजार येथे कार्यरत होती. कालांतराने माजी आमदार सिद्रामप्पा पाटील हे बाजार समितीचे सभापती असताना श्री बसवेश्वर मार्केट यार्डात 33 एकर जागेत बाजार समिती स्थलांतरीत करुन व्यापार्यांना अधिकाधिक सोयी देण्याचा प्रयत्न त्याकाळी करण्यात आला. आजही सदरची बाजार समितीही नजीकच्या बाजार समित्यापेक्षा शेतकर्यांच्या मालाला जास्तीचा दर मिळण्यामध्ये अव्वल ठरले आहे.
आजवर सहकार नेते सिद्रामप्पा पाटील यांचे एकहाती वर्चस्व या बाजार समितीवर होते. काही काळ वगळता आजतागायत बाजार समितीवर त्यांचीच पकड आहे. बाजार समितीच्या 71 वर्षाच्या कार्यकाळत सिद्रामप्पा पाटील अनेकांना सभापती-उपसभापती बनविले. शासनाच्या नव्या धोरणानुसार सहकार व पणन विभागाकडून शेतकर्यांच्या हितासाठी बाजार समितीच्या आवारात विविध योजना राबविण्यात आल्या. नेहमीच या बाजार समितीकडून शेतकरी व व्यापारी यांच्या हितार्थ निर्णय घेण्यात आले. तालुक्यातील सहकार क्षेत्र पाहता सहकारातील सध्या सुरु असलेल्या बाजार समिती व साखर कारखान्याच्या निवडणूका ह्या अविरोध होणे काळाची गरज आहे. त्याकरिता शेतकरी, व्यापारी व अन्य गटातील सर्वांनी एकत्र येवून सहकार नेते माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बाजार समितीच्या उमेदवारी बाबतीत योग्य उमेदवारांना संधी देणार असल्याने अक्कलकोट व दुधनी बाजार समिती निवडणूक अविरोध करण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी व व्यापार्यांतून होत आहे. सहकारात राजकारण न आणता सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून निवडणूक बिनविरोध होण्यावर भर द्यावा अशी देखील मागणी पुढे येत आहे.
