चतुरस्त्र वक्ता -प्रा.मिलिंद जोशी यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन ..
चतुरस्त्र वक्ता -प्रा.मिलिंद जोशी यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन ..
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/07/FB_IMG_1690079660463-430x470.jpg)
चतुरस्त्र वक्ता -प्रा.मिलिंद जोशी यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन ..
——————––——————————-
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
————————————————–
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
■ महाराष्ट्रात आपल्या अमोघ वक्तव्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे अनेक वक्ते असले तरी मी मात्र खर्या अर्थाने चतुरस्त्र म्हणता येईल अशा एका व्यक्तिच्या संपर्कात गेल्या अनेक वर्षांपासून आलो आहे. ते म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले चतुरस्त्र वक्ते प्रा.मिलिंद जोशी यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. मैत्रीचा धर्म जोपासणारे आणि ‘व्यवसायाने अभियंता, वृत्तीने वक्ता आणि लेखणीचा चाहता असे प्रा. जोशी यांचे व्यक्तिमत्त्व आहे. ते आज आपल्या वयाची पन्नाशी ओलांडत आहेत. दसऱ्याचे सोने लुटावे तसे साहित्याचे सोने लुटण्यासाठी प्रा.जोशी म्हणजे शब्दपेढी आहे. श्रीमंत मित्रा सोबत वावरतांना गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे,आणि गरीब मित्रा बरोबर वावरतांना श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे.अशा गुणवत्तेच्या बळावर दमदार वाटचाल करणारा हा तरूण साहित्यिक आणि वक्ता हे महाराष्ट्र शारदेचे लेणे आहे’ अशा शब्दात ‘वक्तृत्वाचे शिवाजी” असे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी प्रा.मिलिंद जोशी यांचे यथोचित वर्णन केले आहे. प्राचार्यांच्या या वारसदाराची दोन दशकातली वक्तृत्वाच्या प्रांतातली कामगिरी आश्वासक आणि प्रेरक आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
■ उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील माणकेश्वर या छोट्याशा खेड्यात सामान्य शेतकरी कुटुंबात मिलिंद जोशी यांचा जन्म झाला. मुलामधले वक्तृत्व गुण ओळखून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिले. बार्शीच्या सुलाखे हायस्कूलमधील शिक्षकांनी या गुणी मुलाला उत्तेजन दिले. शाळकरी असल्यापासून मिलिंद जोशी हे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वक्तृत्वाचे भक्त बनले. त्यांचा त्यांना जवळून सहवास लाभला. पुढे प्राचार्यांचे चरित्रही त्यांनी लिहिले. कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना पाणिनी, आचार्य अत्रे यासारख्या नामवंत राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा जिंकणाऱ्या मिलिंद जोशींनी पदवीनंतर कॉर्पोरेट जगात काम करतानाही वक्तृत्वाची कास सोडली नाही.
■ अभ्यास आणि व्यासंगाला चिंतनाची जोड देऊन त्यांनी आपल्या वक्तृत्वाला स्वत:च पैलू पाडले. अफाट वाचन, स्मरणशक्तीचे वरदान, विलक्षण भाषा प्रभुत्व, भोसले कुळाशी नातं सांगणारी ओघवती वक्तृत्व शैली, अभिनिवेशापेक्षा आशयाला दिलेले प्राधान्य, मर्म विनोदाचा प्रसन्न शिडकावा, समोर कागद न ठेवता तास दोन तास श्रोत्यांना जागेवर खिळवून ठेवण्याची शक्ती, विचारांची स्पष्टता आणि विषयाच्या मुळापर्यंत जाण्याचा त्यांचा स्वभाव आणि समाजाभिमुख वृत्ती यामुळे त्यांची भाषणे केवळ मंत्रमुग्ध करत नाहीत तर विचार देत अंतर्मुखही करतात, याचा अनुभव आल्यामुळे त्यांना मोठा श्रोतृवर्ग मिळाला. महापुरूषांची चरित्रे, संतसाहित्यापासून ते विवेकानंद-अरविंद यांसारख्या महामानवापर्यंत, साहित्यापासून ते समाजापर्यंत कोणताही विषय त्यांच्या वाणीला वर्ज्य नाही. एकच एक विषय घेऊन गावोगाव फिरणाऱ्या वक्त्यांची संख्या महाराष्ट्रात कमी नाही. कारण प्रा.मिलिंद जोशी यांच्यावर दोन शिवाजींची छाप पडली आहे एक म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले आणि दुसरे म्हणजे मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांची.
■ विविध विषयांवर सहजतेने आणि अभ्यासपूर्ण बोलणारा यशस्वी वक्ता अशीच प्रा.जोशींची ओळख आहे. ग्रामीण भागातील वक्त्यांना शहरात मान्यता मिळत नाही. शहरातल्या वक्त्यांना ग्रामीण भागात प्रभाव पाडता येत नाही असे चित्र अनेकदा दिसते. सर्वत्र संचार करणाऱ्या तसेच ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या श्रोत्यांशी सहजपणे संवाद साधणाऱ्या दुर्मिळ वक्त्यांमध्ये प्रा.जोशींचा समावेश करावा लागेल. भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापकाची आणि विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाची जबाबदारी, विचारभारती मासिकाचे संपादक पद तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या सर्वांत जुन्या साहित्य संस्थेेचे कार्याध्यक्षपद सांभाळताना कराव्या लागणाऱ्या कसरतीतही त्यांनी आपले वक्तृत्व आणि लेखन टवटवीत ठेवले आहे. हे ही तितकेच महत्त्वाचे आणि अधोरेखित करणारे आहे. त्यांच्या वक्तृत्वांची गंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, बृहन्महाराष्ट्रात आणि परदेशातही खळाळत राहिली आहे. दगड, सिमेंट आणि विटा यांच्या साहाय्याने बांधकाम करण्याचे शास्त्र शिकवणारा हा प्राध्यापक शब्दांच्या बांधकामातही किती तरबेज आहे हे महाराष्ट्राने अनुभवले आहे.याचे श्रेय त्यांच्या साधनेला आणि परिश्रमाला आहे.
■ प्रा.जोशींनी ललितलेखन, कथालेखन, विनोदी साहित्य, व्यक्तिचित्रे, तत्त्वचिंतनपर लेखन, माहितीपर लेखन, संतसाहित्यातील आधुनिकता मांडणारे लेखन, स्तंभलेखन, सदरलेखन, समीक्षा लेखन अशा साहित्याच्या विविध प्रांतात चौफेर मुशाफिरी केली आहे. त्यांची १८ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्राचार्य हे शिवाजीराव भोसले यांचे चरित्र त्यांनी लिहिले. चरित्रं अशी घडतात, खेळ, पानगळ, तमाच्या तळाशी सारखे कथा संग्रह, हसण्यावारी, लयभारी सारखे विनोदी कथासंग्रह, पाहावे आपणासी आपण सारखे तत्त्वचिंतनपर लेखन, संतसाहित्य आणि आजची पिढी सारखे पुस्तक या सार्याच पुस्तकांना रसिक वाचकांची मान्यता लाभली आणि चतुरस्त्र लेखक म्हणून प्रा.जोशींची ओळख ठळक झाली.या त्यांच्या लेखनकार्यासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. गदिमा जन्मशताब्दी वर्षात लाभलेला गदिमा चैत्रबन पुरस्कार, पुणे फेस्टीवल अवॉर्ड, साने गुरुजी विचारसाधना पुरस्कार, उत्कृष्ट लेखना साठीचा अनंत काणेकर पुरस्कार, चिं.वि. जोशी साहित्य पुरस्कार, डॉ. निर्मलकुमार फडकुले साहित्य पुरस्कार, गोपाळ बनहट्टी आणि बाई देवी व्यास पुरस्कार, नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा पु.ना. पंडित पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ पुणे युनिर्व्हसिटीचा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार, ग्रंथोतेजक सभा पुणेचा विशेष पुरस्कार, ‘मसाप जुळे’ सोलापूर शाखेच्या वतीने दिला गेलेला स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार तसेच डॉ पतंगराव कदम उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जीवनशैली प्रशिक्षक गौर गोपाल दास यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.अशा अनेक नामवंत पुरस्काराचे ते मानकरी आहेत.
■ सीमावासीयांची खंबीरपणे पाठराखण करणार्या प्रा. जोशींनी उचगाव, कुद्रेमनी, बेळगुंदी अशा सीमा भागात होणार्या साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषवून ठामपणे भूमिका मांडली. आचार्य अत्रे साहित्य संमेलन, औंदुबर साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलन, डोंगरी साहित्य संमेलन, ठाणे जिल्हा साहित्य संमेलन यासह अशा अनेक महत्त्वपूर्ण संमेलनांचे अध्यक्षपद प्रा. जोशींनी भूषविले. त्यांच्या चिंतनशील विचारगर्भ अध्यक्षीय भाषणाचा अनुभव साहित्य रसिकांनी घेतला.महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असा नावलौकिक असणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेंच्या ११३ वर्षाच्या इतिहासातले ते सर्वात तरुण कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी साहित्य परिषदेला साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख केले. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने परिषदेच्या कार्याचा विस्तार केला. ग्रामीण भागात परिषदेचे काम गतिमान केले. वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबिविले. समाजपयोगी एखादी भुमिका घेताना त्याची मांडणी,त्यांच्या स्वभावातला स्पष्टवक्तेपणा आणि आंतरिक असणारी तळमळ दिसुन येते. महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तरुणाईला योग्य दिशा देणारे हे व्यक्तिमत्व आहे.
■ अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद निवडणूक न घेता साहित्यिकांना बिनविरोध निवडीने सन्मानपूर्वक दिले जावे यासाठीच्या घटनाबदलासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि त्याला यशही आले. त्यामुळे साहित्य रसिकांना त्यांच्या मनातले साहित्य संमेलनाध्यक्ष मिळाले. पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात जोशी यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला केंद्रस्थानी आणले. उपक्रमातील सातत्य, वैविध्य आणि गुणवत्ता यामुळे साहित्य रसिकांचा परिषदेतला राबता वाढला. तो प्रा.मिलिंद जोशी यांच्यासारख्या समाजमनाची नस ओळखणाऱ्या नेतृत्वामुळे विशेष महत्त्वाचे म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी लोकचळवळ उभा केली. सातत्याने पाठपुरावा तर केलाच पण दिल्लीत जाऊन धरणे आंदोलनही केले. छोट्याशा खेड्यातून सामान्य शेतकरी कुटुंबातून एक मुलगा उरात स्वप्नं घेऊन पुण्यात येतो, कसलीही कौटुंबिक, आर्थिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि गॉडफादर नसताना पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात तिथल्या राजकारणाशी दोन हात करत स्वत:चे पाय घट्ट रोवून उभा राहतो,आणि लेखक-वक्ता म्हणून नांव कमावतो आहे. त्यांची वाटचाल आजच्या तरूण पिढीला प्रेरक आणि मार्गदर्शक ठरावी अशीच आहे. प्रा. मिलिंद जोशी हे ५२ व्या वर्षात पदार्पण करताना त्यांनी वयाची शंभरी गाठावी आणि आपल्या अमोघ वक्तव्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत राहावे, याच आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत.
***💐💐💐*** पद्माकर मा.कुलकर्णी
सोलापूर.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)