सलग सुट्ट्यांत अक्कलकोटमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी ; श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात १० दिवसांत १२ लाखांहून अधिक भाविकांना महाप्रसाद
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पुणे, मुंबईसह महाराष्ट्र व देश-विदेशातून भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून उत्कृष्ट व नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली होती.
सलग सुट्ट्यांच्या काळात गेल्या दहा दिवसांत तब्बल १२ लाखांहून अधिक भाविकांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेतला असून, सरत्या वर्षात भाविकांच्या संख्येने नवा उच्चांक गाठल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाढती गर्दी लक्षात घेऊन अन्नदानाची वेळ वाढविण्यात आली होती. कर्मचारी व सेवेकरी रात्रंदिवस सेवेत तत्पर राहून भाविकांचे हित जपत होते.
शेकडो भक्तांनी केले रक्तदान
सलग सुट्ट्यांच्या कालावधीत सोलापूर येथील विविध रक्तपेढ्यांच्या सहकार्याने अन्नछत्र मंडळाच्या परिसरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो स्वामी भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केले. सामाजिक बांधिलकी जपत भक्तांनी दाखविलेला हा प्रतिसाद कौतुकास्पद ठरला.
चोख पोलीस बंदोबस्त
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दिपक भिताडे यांनी मंदिर परिसर व न्यासाच्या सर्व भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे भाविकांनी सुरक्षित व शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
न्यासाचे नेटके वाहतूक व पार्किंग नियोजन
बाहेरगावाहून आलेल्या वाहनांमुळे मैंदर्गी, बसलेगाव तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर दुतर्फा गर्दी होत होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन न्यासाच्या मैंदर्गी रोडवरील गेटमधून भाविकांना बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग मोकळा करण्यात आला. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी झाली. पार्किंगची व्यवस्था देखील सुयोग्य पद्धतीने करण्यात आल्याने भाविकांना कोणतीही अडचण भासली नाही.
लाखो भाविकांना मोफत महाप्रसाद
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दैनंदिन दोन्ही वेळेस मोफत महाप्रसादाची सुविधा भक्तांच्या यथाशक्तीच्या देणगीतून अखंड सुरू आहे. नियमित दिवशी दररोज २५ हजारांहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात, तर सण-उत्सव, गुरुवार, संकष्टी चतुर्थी, एकादशी, गुरुपौर्णिमा व सलग सुट्ट्यांच्या दिवशी हा आकडा १ लाखांहून अधिक असतो.
अन्नछत्र मंडळाचे नाव सातासमुद्रापार
सलग सुट्ट्यांच्या काळात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा, मध्यप्रदेश, केरळ, तमिळनाडू, गुजरात, दिव-दमन, उत्तराखंड, काश्मीर, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांबरोबरच परदेशातूनही लाखो भाविकांनी अक्कलकोटला भेट दिली. स्वामी समर्थांच्या दर्शनाबरोबरच अन्नछत्र मंडळातील महाप्रसादाची व्यवस्था भाविकांमध्ये विशेष आकर्षण ठरत आहे.
नवीन भव्य महाप्रसादगृहाचे काम प्रगतीपथावर
सन २०२४ च्या गुरुपौर्णिमेला नवीन महाप्रसादगृहाच्या बांधकामास प्रारंभ करण्यात आला आहे. ही भव्य, मंदिरसदृश्य व पूर्णपणे वातानुकुलित इमारत असून तिचे एकूण बांधकाम क्षेत्र सुमारे १ लाख १९ हजार ३९८ चौरस फूट असेल. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फूट उंच, रेखीव व भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे.
या महाप्रसादगृहात एकावेळी २५०० भाविकांना महाप्रसाद देण्याची व्यवस्था असेल, तर एकूण ५ हजार भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त प्रतिक्षा कक्ष उभारण्यात येणार आहेत. तळघरात धान्य व भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी, तासाला ८०० चपात्या तयार करणाऱ्या ७ मशिन्स तसेच भांडी धुण्यासाठी डिश वॉशरची सुविधा असणार आहे. संपूर्ण इमारतीत अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार असून, अंदाजे ६० कोटी रुपये खर्चातून ही वास्तू स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होणार आहे. ही वास्तू श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात मोलाची भर घालणारी ठरणार आहे.
विविध समाजाभिमुख उपक्रम उल्लेखनीय
जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली समर्थ महाप्रसाद सेवा, कुस्तीगीरांसाठी खुराक योजना यासह विविध समाजोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. त्यामुळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे केवळ अन्नदानापुरते मर्यादित न राहता सामाजिक कार्याचे आदर्श केंद्र बनले आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!